Elders play harps as families carry palm branches through fertile sanctuary gardens at sunrise

स्तोत्रसंहिता 92

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 92 सकाळी व रात्री आभार मानणे चांगले आहे असे घोषित करतो. दुष्कर्मी अल्पकाळ भरभराटीस येतात, तर नीतिमान पवित्र अंगणात रोपलेल्या खजुरी व गंधसरूसारखे वाढतात, फलदायी राहून अटळ न्यायाची घोषणा करत.
आभारप्रदर्शनशब्बाथभरभराटविश्वासूपणा
1याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.
2प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,
3दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.
4हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.
5हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!
6मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,
7दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
8परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!
9हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.
10परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.
11माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला; माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.
12नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;
13जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.
14वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.
15ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.