
स्तोत्रसंहिता 91
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 91 दहशत, रोग, संघर्ष आणि धोकादायक मार्गांमध्ये घनिष्ठ निवारा, विश्वासार्ह आश्रय आणि धैर्याचे वर्णन करते. विश्वास धोक्याला नाकारत नाही; तो वचन दिलेली उपस्थिती, सुटका, रक्षण आणि उत्तर मिळालेल्या प्रार्थनेत विसावतो.
आश्रयरक्षणविश्वासधैर्य
1जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”
3कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील.
4ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.
5तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही.
6अंधारात दबा धरून राहणार्या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्या आपत्तीचेही भय वाटणार नाही.
7हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.
8तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील, आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील.
9जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस,
10तर तुला कोणतीही इजा होणार नाही, किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
11कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.
12ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये.
13तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील.
14याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे.
15तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.
16दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.