
स्तोत्रसंहिता 112
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 112 आदर, औदार्य, न्याय आणि विश्वासाने घडलेल्या लोकांचे वर्णन करते. त्यांचा प्रभाव अंधारात प्रकाश बनतो; वाईट बातमीही करुणा व आत्मविश्वासी आशेत सुरक्षित स्थिर हृदय उखडू शकत नाही.
औदार्यविश्वासन्यायस्थिरता
1याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.
2त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
3संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.
4सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.
5ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
6निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.
7वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
8यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
9गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.
10दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील; ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील, आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.