A couple walking together through a fruitful vineyard with palms and pomegranates

गीतरत्न 7

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
प्रियकर कारागिरी, शेते, बुरुज, खजुरी, फळे आणि द्राक्षारसाच्या प्रतिमांसह स्त्रीच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करतो. ती आत्मविश्वासाने पुष्टी करते की ती त्याची आहे आणि त्याची इच्छा स्वीकारते. एकत्र ते ग्रामीण भाग, गावे, द्राक्षमळे आणि फुले प्रेम सामायिक करण्याचे ठिकाण म्हणून निवडतात.
परस्पर इच्छासौंदर्यआपलेपणाफलदायीपणासामायिक प्रवास
1हे राजकन्ये, पायतणे घातलेले तुझे पाय किती सुंदर दिसतात! कुशल कारागिराने घडविलेल्या रत्नाप्रमाणे तुझ्या मांड्या वळणदार आहेत.
2तुझी नाभी गोलाकार पेल्यासारखी असून, त्यात मसालेदार मद्याची कधीच वाण पडत नाही, तुझी कंबर कमळिनीपुष्पांनी वेढलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत.
4हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.
5तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे. तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे; या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे.
6माझ्या प्रिये, तू किती सुंदर आणि प्रसन्न करणारी आहेस, तू अत्यंत मनमोहक आहेस!
7तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस. खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत.
8मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन आणि त्याच्या घोसांना धरीन; तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,
9तुझे मुख उत्तम द्राक्षारसासारखे होवो. नायिका द्राक्षारस ओठांवरून दातांना स्पर्श करून, थेट माझ्या प्रिये कडे जावो,
10मी माझ्या प्रियकराची आहे, आणि तो माझीच कामना करतो.
11माझ्या प्रिया, ये, चल, आपण रानावनात जाऊ, गावामध्ये रात्र घालवू.
12सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन.
13त्या ठिकाणी दुदाफळाचे सुगंध दरवळत असतात, आणि दुर्मिळ फळे आमच्या दाराशीच उपलब्ध होतात नवीन आणि जुनीही फळे, ही सर्व माझ्या प्रियकरासाठी राखून ठेवली आहेत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.