
गीतरत्न 1
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्त्री आपल्या प्रियकराची तळमळ करते आणि त्याचे प्रेम, सुगंध व नाव साजरे करते. ती सूर्याने काळ्या पडलेल्या सौंदर्याबद्दल व द्राक्षमळ्यातील श्रमाबद्दल प्रामाणिकपणे बोलते, नंतर कळपांमध्ये त्याला शोधते. प्रेमी रत्ने, अत्तर, हिरवी शेते, गंधसरू आणि देवदारच्या प्रतिमांखाली एकमेकांची स्तुती करतात.
तळमळपरस्पर प्रशंसासौंदर्यद्राक्षमळेआपलेपणा
1हे गीतरत्न, शलोमोनाची रचना.
2तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.
3तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे; तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे. तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!
4चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. मैत्रिणी आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. नायिका त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!
5अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्याच्या पडद्यासारखी.
6मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.
7मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?
8अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही, तर कळपांच्या ठशांचे अनुसरण करत ये आणि मेंढपाळाच्या तंबूशेजारी तू आपली करडे चार.
9माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, मी तुझी तुलना करतो.
10तुझे गाल कर्णभूषणासह, तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे.
11आपण तुझ्यासाठी सोन्याचे, रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ.
12राजा त्याच्या मेजाजवळ असता, माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता.
13माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीप्रमाणे आहे.
14माझा प्रिय माझ्यासाठी जणू एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे.
15माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! अहा, किती सुंदर! तुझे नयन कबुतरे आहेत.
16माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! अहा, किती मोहक! आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
17आमच्या घराच्या तुळया केदारच्या; व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.