A cloud-clothed angel standing across sea and land gives John a small open scroll

प्रकटीकरण 10

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
ढगाने वेष्टित शक्तिशाली देवदूत समुद्र व जमिनीवर उभा राहून एक लहान उघडी गुंडाळी धरतो. सात गडगडाट सीलबंद राहतात, तर योहान गुंडाळी खातो, ती गोड नंतर कडवट आढळतो, आणि अनेक लोक व शासकांसमोर पुन्हा भविष्यवाणी करण्यासाठी नियुक्त होतो.
शक्तिशाली देवदूतलहान गुंडाळीसात गडगडाटभविष्यसूचक नियुक्ती
1मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.
2त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला.
3मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले.
4त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द मोहरबंद कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.”
5मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचाविला.
6आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!
7पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”
8मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.”
9त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करेल.”
10तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले.
11तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.