Two sackcloth-clad witnesses between olive trees and lampstands rising toward an opened heavenly sanctuary

प्रकटीकरण 11

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
योहान पवित्रस्थान मोजतो तर दोन साक्षीदार जुलमाखाली भविष्यवाणी करतात, श्वापदाकडून मारले जातात, आणि पुनरुत्थान व आरोहणाद्वारे सार्वजनिकपणे न्यायी ठरवले जातात. सातवे कर्णे देवाचे राज्य, न्याय, बक्षीस आणि स्वर्गीय मंदिराचे उघडणे घोषित करते.
दोन साक्षीदारसाक्षसातवे कर्णेदेवाचे राज्य
1मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे.
2पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील.
3आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”
4“ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत.
5आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या शत्रूंना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे.
6त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे.
7त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल.
8ज्या मोठ्या शहराला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त असे म्हटले आहे आणि ज्या शहरात त्यांच्या प्रभूला क्रूसावर खिळण्यात आले होते, त्या शहरातील रस्त्यांवर त्यांची प्रेते पडून राहतील.
9सर्व लोक, वंश, भाषा आणि राष्ट्रे त्यांची प्रेते साडेतीन दिवस टक लावून पाहतील आणि त्यांना पुरण्यास नकार देतील.
10उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.
11पुढे साडेतीन दिवसानंतर परमेश्वरापासून येणारा जीवनदायी श्वास त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला.
12मग स्वर्गातून एक मोठी वाणी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी ऐकली. ती म्हणाली, “इकडे वर या!” तेव्हा ते आपल्या शत्रूंच्या देखत मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले.
13त्याच घटकेस एक प्रचंड भूमिकंप झाला आणि शहराचा एक दशांश भाग जमीनदोस्त होऊन, सात हजार लोक मरण पावले. तेव्हा भूमिकंपातून वाचलेल्या प्रत्येकाने भयभीत होऊन स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले.
14दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
15कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”
16तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली.
17ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.
18राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”
19तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमिकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.