
प्रकटीकरण 9
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
पाचवे कर्णे पाताळ उघडते आणि पीडा देणारे पण न मारणारे भयंकर टोळधाडसदृश प्राणी सोडते. सहावे चार देवदूत व प्रचंड घोडदळ सोडते जे मृत्यू आणतात, तरी वाचलेले मूर्तिपूजा, हिंसा, जादूटोणा, अनैतिकता आणि चोरीचा पश्चात्ताप करण्यास नकार देतात.
पाचवे कर्णेसहावे कर्णेपाताळअपश्चात्ताप
1मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.
2तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.
3मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.
4पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते.
5त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्या पीडेसारखी ती होती.
6त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.
7पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.
8त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
9त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता.
10त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती.
11अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.
12एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
13नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली.
14ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “यूफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.”
15आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.
16घोडदळाची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली.
17त्या दृष्टान्तात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नीसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची ऊरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सर्व निघत होते,
18आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली.
19त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.
20त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, कास्याच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.
21तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.