
स्तोत्रसंहिता 66
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 66 संपूर्ण पृथ्वीला महान सुटकेची साक्ष देण्यासाठी बोलावतो. समाज पाणी पार करणे, शुद्धीकरणाचा अग्नी व चिरडणारे ओझे सहन करणे, नंतर विपुलतेत प्रवेश करणे आठवतो; एक व्यक्ती नवस व उत्तर मिळालेल्या प्रार्थनेच्या वैयक्तिक साक्षीने स्तुती पूर्ण करते.
सुटकापरीक्षासाक्षस्तुती
1अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!
2त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
3परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.
4पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील; ते तुमच्या गौरवांची गीते गातील, ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.” सेला
5या आणि पाहा, परमेश्वराने काय केले, त्यांनी लोकांच्या बाबतीत किती अद्भुत कृत्ये केली!
6त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली; ते जलातून पायी पलीकडे गेले— यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या.
7आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला
8अहो सर्व लोकहो. परमेश्वराची स्तुती करा, त्यांची स्तुतिस्तोत्रे ऐकू येवो.
9कारण आमचे जीवन त्यांच्या हाती आहे आणि ते आमची पावले घसरू देत नाही.
10हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.
11तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.
12तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.
13मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन, माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे—
14कारण मी संकटात होतो, तेव्हा माझ्या ओठांनी अभिवचन दिले आणि माझ्या मुखाने मी ते विदित केले.
15म्हणूनच पुष्ट पशूंची तसेच मेंढ्याची होमार्पणे तुमच्याकडे आणेन; मी गोर्हे आणि बोकडांचे अर्पण करेन. सेला
16अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका; त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन.
17साहाय्यासाठी मी मुखाने त्यांचा धावा केला; आणि माझ्या जिभेवर त्यांची स्तुती होती.
18मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता;
19परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे.
20परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.