A watched captive holds a tear bottle before walking toward dawn past broken chains

स्तोत्रसंहिता 56

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 56 शत्रुत्वाच्या पलिष्ट्यांमध्ये बंदिवासातून बोलतो, जिथे शत्रू पाहतात व शब्द वळवतात. भीती नाकारण्याऐवजी मान्य केली जाते, अश्रू आठवले जातात, आणि विश्वास अशा आत्मविश्वासात वाढतो की मानवी धमक्या अखेर विजयी होऊ शकत नाहीत.
भीतीविश्वासअश्रूसुटका
1हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात.
2माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत.
3परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
4परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?
5दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात; माझा पाडाव कसा करावा, यासंबंधीचाच ते विचार करीत असतात.
6ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात; माझ्या पावलांचा कानोसा घेत, मला ठार करण्याच्या संधीची वाट पाहतात.
7त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका.
8तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?
9ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.
10परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—
11मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?
12माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन.
13कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे आणि माझे पाय घसरण्यापासून सावरले आहेत; जेणेकरून मला परमेश्वरासमोर जीवनाच्या प्रकाशात चालता यावे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.