A kneeling psalmist prays by a stone wall as a shepherd leader and musicians gather nearby

स्तोत्रसंहिता 28

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 28 अनुत्तरित मौनाची भीती बाळगतो आणि कपटी दुष्कर्म्यांचे भाग्य वाटून घेऊ नये अशी विनंती करतो. सामर्थ्य, रक्षण, आणि संपूर्ण लोकांसाठी मेंढपाळासारखी काळजी निश्चित होते तेव्हा विनंती आभारप्रदर्शनात वळते.
विनंतीसामर्थ्यरक्षणस्तुती
1याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.
2मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका.
3दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.
4जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.
5कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.
6याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
7याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
8याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.
9तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.