
स्तोत्रसंहिता 21
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 21 राजाची इच्छा, सामर्थ्य, सन्मान आणि चिरस्थायी आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो. राजेशाही यश एकाकी आत्मप्रशंसा किंवा अहंकाराऐवजी आनंद व स्तुतीचा सार्वजनिक प्रसंग बनते.
राजपदआनंदसामर्थ्यआभारप्रदर्शन
1याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो!
2कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत; त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. सेला
3उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले; तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला.
4त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.
5तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला; तुम्ही त्याला ऐश्वर्य व वैभव दिले.
6सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले आणि तुमच्या समक्षतेचा आनंद तुम्ही त्याला दिला.
7कारण राजाचा भरवसा याहवेहवर आहे; सर्वोच्च परमेश्वराच्या अक्षय प्रीतीमुळे तो कधीही ढळणार नाही.
8तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील. तुमचा उजवा हात तुमच्या विरोधकांचा ताबा घेईल.
9तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल, तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल. आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील, याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल.
10तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून, त्यांचे वंशज मानवजातीतून कायमचे नाहीसे कराल.
11ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात, आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत.
12जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल तेव्हा पाठ दाखवून पळण्यास तुम्ही त्यांना भाग पाडाल.
13याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.