An elder leads a weary petitioner from ruined darkness toward sunrise, water, and a level road

स्तोत्रसंहिता 143

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 143 शत्रू वक्त्याला अंधाराकडे नेत असताना न्यायाऐवजी दयेची विनंती करतो. आठवलेली कार्ये विश्वास जागृत करतात, सकाळचे प्रेम मार्गदर्शन आणते, आणि पुनरुज्जीवित आत्मा विश्वासू आज्ञापालनाचा सरळ मार्ग शिकतो.
दयामार्गदर्शनसकाळपुनरुज्जीवन
1हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.
2आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.
3माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे; त्याने मला जमिनीवर तुडविले आहे; जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे, तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.
4माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे; भीतीने मी हतबल झालो आहे.
5मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.
6मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो; शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला
7हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.
8प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
9याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.
10तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.
11हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.
12माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.