
स्तोत्रसंहिता 141
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 141 प्रार्थनेला शिस्तबद्ध चारित्र्यासोबत जोडतो. उठणारा धूप उपासनेचे प्रतीक आहे तर सांभाळलेले भाषण, नियंत्रित भूक, स्वीकारलेली सुधारणा, आणि लपलेल्या सापळ्यांपासून सुटका दबावाखालीही विश्वासू राहण्याची इच्छा व्यक्त करतात.
प्रार्थनाभाषणशिस्तसुधारणा
1हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.
2तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.
3हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.
4माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका, पातक्यांच्या सहवासात राहून, कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा; त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.
5नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.
6दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल; तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.
7ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात, तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.”
8परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.
9दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा, त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.
10दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे, आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.