Grieving families kneel among overturned sanctuary vessels and smoke-darkened walls after invasion

स्तोत्रसंहिता 79

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 79 आक्रमण झालेल्या यरुशलेमवर, अपवित्र केलेल्या पवित्रस्थानावर, आणि आजूबाजूच्या राष्ट्रांसमोरील सार्वजनिक निंदेवर विलाप करतो. समाज गरज कबूल करतो, दयाळू सुटकेसाठी विनवणी करतो, आणि पुनर्स्थापित लोक पिढ्यानपिढ्या स्तुती करू शकतील म्हणून चिरस्थायी आभाराचे वचन देतो.
विलापपुनर्स्थापनादयासमाज
1हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.
2तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत, ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत, तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.
3त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती पाण्याप्रमाणे वाहविले आहे, मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.
4आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.
5हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?
6अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.
7त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.
8आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
9हे आमच्या उद्धारक परमेश्वरा, तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा; तुमच्या नामाकरिता आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.
10इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.
11बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.
12हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.
13मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.