
स्तोत्रसंहिता 50
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 50 कराराच्या बोलावण्याचे चित्रण करतो ज्यात निर्मिती न्यायाची साक्षी असते. देवाला मानवी तरतुदीची गरज नाही, विश्वासूपणापासून वेगळे केलेले विधी नाकारतो, आणि आभारप्रदर्शन, पूर्ण झालेली बांधिलकी, सत्यवचन आणि शेजाऱ्यांप्रती न्यायाची मागणी करतो.
उपासनाकरारन्यायआभारप्रदर्शन
1सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.
2सौंदर्यात परिपूर्ण असलेल्या सीयोनमधून, परमेश्वराचे गौरव प्रकाशते.
3आमचे परमेश्वर येतील आणि ते स्वस्थ राहणार नाहीत; त्यांच्याभोवती खवळलेले वादळ व विध्वंस करणारा अग्नी आहे.
4ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील; आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात:
5“त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”
6आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते, कारण ते न्यायी परमेश्वर आहेत. सेला
7“ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.
8तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच.
9मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.
10कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;
11पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.
12मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.
13बैलाचे मांस माझा आहार आहे का किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?
14“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,
15आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”
16परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?
17कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.
18तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता.
19तुझी जीभ कपट रचते तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते.
20तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.
21तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.
22“तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा, मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही:
23जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.