A sick remorseful man bows apart from distant friends as an elder approaches to help

स्तोत्रसंहिता 38

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 38 गंभीर शारीरिक दुःख, अपराधभाव, एकाकीपण आणि शत्रुत्वाचा आरोप न लपवता व्यक्त करतो. स्वतःचा बचाव करू न शकणारा स्तोत्रकार चूक कबूल करतो, आपली इच्छा उघडपणे देवासमोर ठेवतो, आणि तातडीने मदतीची वाट पाहतो.
विलापदुःखकबुलीवाट पाहणे
1याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका. संतापून मला दंड करू नका.
2तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत.
3तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.
4माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे.
5माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे.
6मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे; मी दिवसभर शोक करीत असतो.
7माझ्या पाठीचा दाह होत आहे; माझ्या अंगी अजिबात आरोग्य राहिलेले नाही.
8मी पार गळून व चिरडून गेलो आहे; माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे.
9प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता; माझा प्रत्येक उसासा तुम्ही ऐकता.
10माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे; मी आंधळा होत आहे असे मला वाटते.
11माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात.
12माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.
13परंतु मी ऐकू न येणार्‍या बहिर्‍यासारखा झालो आहे; बोलता न येणार्‍या मुक्या माणसासारखा मी झालो आहे.
14ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे.
15याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या.
16कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्‍यांना आनंद मिळू देऊ नका.”
17कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे.
18मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे.
19अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत.
20माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो, तरीही ते माझा द्वेष करीत आहेत.
21याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका.
22माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.