A worshiper washes at a bronze basin while corrupt dealings remain outside a joyful gathering

स्तोत्रसंहिता 26

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 26 शोध घेणाऱ्या परीक्षेची विनंती करतो आणि कपट, लाच व हिंसेला जाणीवपूर्वक नकार दिल्याची पुष्टी करतो. उपासनास्थळावरील प्रेम जमलेल्या समाजात आभारप्रदर्शन व दृढ पायाकडे नेते.
प्रामाणिकपणापरीक्षाउपासनाआभारप्रदर्शन
1याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
2याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा.
3कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
4कपटी लोकांसोबत मी बसत नाही किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.
5दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.
6मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,
7म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.
8याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते.
9पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.
10त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत, त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.
11मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन; मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.
12माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.