
स्तोत्रसंहिता 2
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 2 राष्ट्रांना दैवी सत्तेला विरोध करताना आणि देवाचा अभिषिक्त राजा सियोनवर सुरक्षित उभा असताना चित्रित करते. पृथ्वीवरील सत्तेला निरर्थक विरोधाऐवजी शहाणपण, नम्र सेवा आणि आश्रयाकडे इशारा दिला जातो.
राजपदसियोनराष्ट्रेआश्रय
1राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
2याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,
3“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”
4स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.
5ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,
6“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”
7मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.
8माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.
9तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”
10म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा.
11भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.
12त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.