
स्तोत्रसंहिता 146
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 146 मर्त्य शासकांवर अंतिम आशा ठेवण्याविरुद्ध इशारा देतो ज्यांच्या योजना त्यांच्यासोबत मरतात. चिरस्थायी मदत त्याऐवजी न्याय, अन्न, स्वातंत्र्य, दृष्टी, स्वागत, रक्षण आणि समाजातील असुरक्षित लोकांसाठी आधार निर्माण करते.
आशान्यायअसुरक्षितशासक
1याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
2आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
3तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.
4कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.
5तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,
6कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.
7गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात,
8ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
9याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
10याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.