Micah watches dawn break over the sea while a shepherd gathers a flock on green hills and shadowed city officials exchange bribes behind him

मीखाह 7

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
मीखाह विश्वासूपणा रिकाम्या झालेल्या समाजासाठी शोक करतो, जिथे अधिकारी कट रचतात आणि जवळचे नातेसंबंधही असुरक्षित बनतात. तरीही तो देवाची वाट पाहतो आणि अंधार प्रकाश बनेल यावर विश्वास ठेवतो. समारोपाची प्रार्थना मेंढपाळ पुनर्स्थापनेची विनंती करते आणि क्षमा, करुणा व कराराच्या विश्वासूपणाचा उत्सव साजरा करते.
भ्रष्टाचारसतर्क आशामेंढपाळीकरुणाक्षमा
1काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.
2पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात.
3वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.
4त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.
5शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर.
6कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात.
7मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.
8अरे माझ्या वैर्‍या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील.
9मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.
10मग माझे शत्रू हे पाहून ते लज्जेने झाकले जातील, ती जी मला म्हणत होती, “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” माझे डोळे तिचे पतन पाहतील; रस्त्याच्या चिखलाप्रमाणे तीही पायाखाली तुडविली जाईल.
11तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, आणि तुमच्या सीमा विस्तारित करण्याचा दिवस येईल.
12अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत आणि मिसरपासून फरात नदीपर्यंत, समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील.
13पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.
14आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, जो तुझ्या वतनाचा कळप आहे, जो एकटाच जंगलात, सुपीक कुरणात राहतो. त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात यथेच्छ चरू द्या.
15“तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.”
16राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील.
17ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.
18तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.
19पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल.
20फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.