Micah stands above lowland towns as overwhelming light breaks through storm clouds and water streams down mountains toward Samaria and Jerusalem

मीखाह 1

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
मीखाह सर्व लोकांना साक्षी होण्यासाठी बोलावतो कारण परमेश्वर न्यायात येतो, प्रतीकात्मकपणे पर्वत वितळवत व दऱ्या फोडत. शोमरोनची मूर्तिपूजा नाश आणते, आणि आपत्ती यरुशलेमच्या वेशीपर्यंत पोहोचते. संदेष्टा यहूदाच्या नगरांतून शब्दखेळाद्वारे दुःख, लाज आणि हद्दपारीचा माग काढत शोक करतो.
न्यायमूर्तिपूजाशोमरोनविलाप
1यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.
2सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका, पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या, सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून, तुमच्याविरुद्ध साक्ष देतील.
3पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.
4त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.
5हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. याकोबाचा अपराध काय आहे? ते शोमरोन आहे की नाही? यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? ते यरुशलेम नाही की नाही?
6“म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन.
7तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”
8म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.
9कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; ती यहूदीयामध्ये पसरली आहे. ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.
10गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.
11शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.
12मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.
13लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.
14त्यामुळे तू मोरेशेथ-गथला निरोपाची भेट देशील. अकजीब चे रहिवासी इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.
15मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.
16ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.