
इय्योब 18
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
बिल्दाद तक्रार करतो की इय्योब त्यांना मूर्ख गुरांसारखे वागवतो, नंतर दुष्ट माणसाचा अंत जिवंत रंगांत रंगवतो. त्याचा दिवा विझतो, प्रत्येक पावलावर सापळे वाट पाहतात, दहशत त्याचा मागून पाठलाग करते, रोग त्याची त्वचा खातो, अग्नी त्याच्या तंबूवर बसतो, आणि त्याचे नाव पुढे नेणारा वंशज उरत नाही.
बिल्दाददुष्टन्यायदहशत
1यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले:
2“ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस? जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू.
3आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?
4रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?
5“दुष्टांचा दिवा विझून जातो; त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात.
6त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो; त्याच्या जवळचा दिवा विझून जातो.
7त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो; त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात.
8त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात; आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो.
9फास त्याची टाच पकडते; आणि तो सापळ्यात धरला जातो.
10त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे.
11आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.
12विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे.
13रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.
14त्याच्या सुरक्षित डेर्यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.
15अग्नी त्याच्या डेर्यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.
16त्याची मुळे खाली सुकतात आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात.
17पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही.
18प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे; आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे.
19त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत.
20पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात; हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात.
21पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.