Travelers emerging from a storm to share food and shelter with vulnerable neighbors

याकोब 1

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
याकोब विश्वासणाऱ्यांना स्थिर विश्वासाने परीक्षांना सामोरे जाण्याची, देवाकडे शहाणपण मागण्याची, आणि पापाला जन्म देणाऱ्या इच्छांचा प्रतिकार करण्याची विनंती करतो. खरी भक्ती रोपलेले वचन स्वीकारते, त्यावर कृती करते, भाषण नियंत्रित करते, आणि असुरक्षित लोकांची काळजी घेते.
परीक्षाशहाणपणसक्रिय आज्ञापालनकरुणा
1परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा.
2माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना.
3कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.
4धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.
5जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.
6परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे.
7अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये.
8असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.
9दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा.
10परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.
11जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.
12जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.
13मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत;
14परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.
15मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती वासना पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली म्हणजे पाप मरणास जन्म देते.
16म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका.
17प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते.
18त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.
19माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा.
20कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही.
21यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टतेचा त्याग करा व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे.
22वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
23कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्‍यासारखा आहे.
24तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो.
25परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो.
26जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवितात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे.
27परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.