
2 योहान 1
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
वडील आनंद मानतो की निवडलेल्या घराण्यातील सदस्य सत्यात चालतात आणि एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा पुन्हा सांगतो. फसवणारे ख्रिस्ताच्या देहात येण्याला नाकारत असल्याने, विश्वासू प्रेमात शिकवण व आदरातिथ्याबद्दल विवेचन समाविष्ट असावे लागते.
सत्यप्रेमआज्ञापालनविवेचन
1मंडळीचा वडील याजकडून, एक स्त्री जिची परमेश्वराकडून निवड झालेली आहे, ती आणि तिची मुले यांच्यासाठी ज्यांच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो आणि केवळ मीच नाही परंतु ते सर्वजण ज्यांना सत्याची ओळख झाली आहे,
2कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील.
3परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील.
4पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला.
5आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
6प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.
7मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे.
8आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.
9जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी या शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत.
10जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका.
11तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल.
12तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.
13जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.