Household stewards sharing provisions while a travel-worn apostle enters a Corinthian courtyard

1 करिंथकरांस 4

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
प्रेषित सेवक व कारभारी आहेत ज्यांच्या विश्वासूपणाचा देव न्याय करेल, म्हणून अकाली अभिमान चुकीचा आहे. पौल करिंथी अहंकाराला प्रेषितीय कठिणाईशी विरोधाभास देतो आणि सुधारात्मक मार्गदर्शनाचा हेतू असलेला काळजी घेणारा बाप म्हणून लिहितो.
कारभारनम्रताप्रेषितीय कठिणाईसुधारणा
1ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे.
2आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे.
3तुम्ही माझा न्याय केला किंवा कोणत्याही मानवी न्यायालयाने केला; तर मी त्याची जास्त काळजी करत नाही, निश्चित, मी स्वतःचाही न्याय करीत नाही.
4कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करेल.
5यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.
6आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्‍याला कमी लेखू नये.
7तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता?
8इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहात, आम्हाला सोडून राज्य करीत आहात; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो.
9मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे.
10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख आहोत, ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही सशक्त आहात! आम्ही अप्रतिष्ठित आहोत, तुम्ही तर प्रतिष्ठित आहात!
11या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तहानलेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत.
12आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो;
13आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत.
14तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे.
15ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे.
16म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
17या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल.
18मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत.
19परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन.
20परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे.
21तुम्हाला काय आवडेल, मी तुम्हाकडे शिस्तीची काठी घेऊन, की प्रेम भावाने आणि सौम्य आत्म्याने यावे?

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.