Believers planting and watering a garden beside coworkers building carefully on a stone foundation

1 करिंथकरांस 3

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
मत्सरी स्पर्धा करिंथकरांची अपरिपक्वता दाखवते, कारण पौल व अपुल्लो देवाच्या शेतातील केवळ सेवक आहेत. देव वाढ देतो, आणि प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने एकाच पायावर, येशू ख्रिस्तावर, काळजीपूर्वक बांधावे लागते.
आध्यात्मिक वाढदेवाचे सहकारीपायाख्रिस्त
1प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आत्म्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात.
2मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.
3तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?
4तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
5तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती.
6मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले.
7पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
8जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.
9आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
10परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्‍यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे.
11जो पाया आधी घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही.
12जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल.
13तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.
14बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्‍याला त्याचे प्रतिफळ मिळेल.
15परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्‍याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांमधून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल.
16तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?
17जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.
18तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल,
19कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”
20आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभू जाणतात.”
21तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे.
22मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत.
23पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.