Aging David charging Solomon among stores of stone, cedar, bronze, and iron

1 इतिहास 22

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
दावीद मंदिराची जागा ओळखतो आणि प्रचंड सामग्री, कारागीर व परदेशी कामगार जमवतो. शलमोन ते बांधणार असल्याने, दावीद आपल्या मुलाला आणि इस्राएलच्या नेत्यांना धैर्याने कृती करण्याची व देवाला शोधण्याची आज्ञा देतो.
तयारीमंदिरधैर्यउत्तराधिकार
1मग दावीद म्हणाला, “याहवेह परमेश्वराचे मंदिर व इस्राएलसाठी होमबलीची वेदी याच ठिकाणी असली पाहिजे.”
2दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्‍या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली.
3प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला.
4त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते.
5दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.
6नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.
7दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,
8परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.
9परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.
10तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’
11“आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.
12तुझे याहवेह तुला सुबुद्धी आणि चातुर्य देवो आणि जेव्हा ते तुला इस्राएलवर अधिकार देतील, तुला त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची बुद्धी देवो, म्हणजे तू याहवेह तुझ्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करशील.
13याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको.
14“मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.
15तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार.
16सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
17नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्‍यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली.
18तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.
19आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.