
जखर्याह 13
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
पाप व अशुद्धतेपासून शुद्धीकरणासाठी एक झरा उघडतो. मूर्ती, खोटे संदेष्टे, आणि फसवी भविष्यसूचक ओळख भूमीतून काढली जाते. नंतर मेंढपाळावर आघात होतो आणि मेंढरे विखुरतात; गंभीर परीक्षा येते, तरी शुद्ध केलेला तिसरा भाग देवाला हाक मारण्यासाठी व त्याचे लोक म्हणून ओळखले जाण्यासाठी राहतो.
शुद्धीकरणाचा झरामूर्ती काढणेआघात झालेला मेंढपाळशुद्ध केलेला अवशेष
1“त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.
2“त्या दिवशी, मी संपूर्ण देशातून मूर्तींच्या नावाचा समूळ उच्छेद करेन, ते त्यांच्या स्मरणातही राहणार नाही. सर्व खोट्या संदेष्ट्यांचा आणि अशुद्धतेच्या आत्म्याचा मी समूळ नाश करेन,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
3“आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील!
4“त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.
5प्रत्येकजण म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही; मी एक शेतकरी आहे; तारुण्यापासून भूमीची मशागत करणे माझ्या उपजीविकेचे साधन आहे. ’
6त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’
7“अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”
8याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील, परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील.
9हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.