
रोमकरांस 13
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
पौल शासक अधिकाऱ्यांप्रती जबाबदार आचरणाची आणि योग्य कर्तव्ये भरण्याची विनंती करतो. प्रत्येक आज्ञा शेजाऱ्यावरील प्रेमात एकत्रित आहे, आणि जवळ येणारा दिवस विश्वासणाऱ्यांना जागृतता, सन्माननीय जीवन, आणि प्रकाशाच्या शस्त्रांची हाक देतो.
अधिकारीनागरी कर्तव्यप्रेम नियमशास्त्र पूर्ण करतेजागृतता
1प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत.
2यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील.
3जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.
4कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.
5यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.
6याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.
7प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.
8इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
9या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,” आणि इतर दुसर्या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.
10प्रीती शेजार्याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते.
11आणखी हे करा, सध्याचा समय ओळखून घ्या: झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे.
12रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा.
13दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.
14यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.