A crowned rider on a white horse advancing from open heaven as a vast multitude gathers near a wedding feast

प्रकटीकरण 19

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्वर्ग बाबेलचा न्याय केल्याबद्दल देवाची स्तुती करतो आणि कोकऱ्याच्या विवाह मेजवानीची घोषणा करतो. योहानला देवदूताची उपासना केल्याबद्दल सुधारले जाते, नंतर तो विश्वासू व सत्य स्वार श्वापद, खोटा संदेष्टा आणि जमलेल्या राजांचा पराभव करताना पाहतो.
स्वर्गीय स्तुतीविवाह मेजवानीविश्वासू व सत्यअंतिम विजय
1यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!
2कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”
3आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.
4तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!”
5तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.”
6नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात!
7चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.
8तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे,” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.
9तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.”
10तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”
11तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो.
12त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही.
13त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.
14स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्‍या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते.
15“त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.” ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील.
16त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.
17नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्‍या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!
18या आणि राजांचे, कप्तानांचे व मोठमोठ्या सेनाधिकार्‍यांचे मांस खा! घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे, सर्व लहान, थोर, स्वतंत्र, दास यांचे मांस खावयास या.”
19तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले.
20त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.
21जो घोड्यावर बसलेला स्वार होता त्याच्या मुखातून बाहेर येणार्‍या तलवारीने बाकी राहिलेले मारले गेले आणि सगळ्या पक्षांनी आधाशीपणे त्यांचे मांस खाल्ले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.