
नीतिसूत्रे 24
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
शहाणपण बलवान घर स्थापित करते आणि विपत्तीत धैर्य देते. नीतिमान पडल्यानंतर उठतात, हानीकडे नेल्या जाणाऱ्यांकडे शेजाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, शत्रू आनंदाचे कारण नाहीत, आणि दुर्लक्षित शेते आळशी सबबी उघड करतात.
शहाणपणसुटकालवचिकतापरिश्रम
1दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका;
2कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात.
3सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;
4ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात.
5सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात.
6लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते.
7सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये.
8जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील.
9मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात.
10जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!
11ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव.
12जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का?
13माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल.
14त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही.
15चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;
16कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.
17जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये,
18नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.
19वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका,
20कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल.
21माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्यांना सहभागी होऊ नकोस,
22कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे?
23ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच:
24जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील.
25परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल.
26प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे.
27तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.
28विनाकारण तुझ्या शेजार्याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय?
29असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”
30एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो;
31सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते.
32जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो:
33आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
34आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.