Israelite families presenting grain and drink offerings while wearing blue-cord tassels

गणना 15

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
गणना 15 कनानमधील जीवनासाठी अर्पणाच्या सूचना देतो आणि मूळ इस्राएली व परदेशी रहिवाशांना एकच नियम लावतो. ते अनवधानी आणि उद्धट पापात फरक करतो, शब्बाथ भंगासाठीचा न्याय सांगतो, आणि देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची आठवण म्हणून निळ्या दोऱ्यांचे गोंडे आज्ञापतो.
अर्पणेसमान नियमशब्बाथस्मरण
1याहवेह मोशेला म्हणाले,
2“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: जो देश मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देत आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल
3आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो.
4अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.
5होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा.
6“ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे,
7आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे.
8“ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता,
9बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे.
10आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे.
11प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे.
12जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.
13“ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या.
14जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे.
15समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्‍या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात.
16तुमच्यासाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी एकच नियम व कायदे असावेत.’ ”
17याहवेह मोशेला म्हणाले,
18“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुम्ही जेव्हा जाल
19आणि त्या भूमीचे फळ खाल, तेव्हा त्याचा एक भाग याहवेहसमोर सादर करावा.
20तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी.
21तुमच्या मळलेल्या पिठाच्या पहिल्या भागाचे हे अर्पण तुम्ही याहवेहला तुमच्या भावी पिढ्यांपर्यंत करावे.
22“ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला—
23ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्‍या पिढ्यांसाठी त्या असतील—
24आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्‍ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
25याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत.
26सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते.
27“ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी.
28ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल.
29जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो.
30“ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.
31कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”
32इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला.
33तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले,
34आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते.
35मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.”
36मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.
37याहवेह मोशेला म्हणाले,
38“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्‍या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा.
39ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये.
40मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल.
41तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.