Joshua and Israel’s leaders overlooking conquered cities and the Jordan valley

यहोशुआ 12

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
अध्याय मोशेच्या नेतृत्वाखाली यार्देनच्या पूर्वेस आणि यहोशुआच्या नेतृत्वाखाली पश्चिमेस पराभूत झालेल्या राजांची नोंद करतो. हे व्यवस्थित स्मरण वाळवंटाच्या सीमांपासून डोंगराळ प्रदेशातून आणि संपूर्ण भूमीतील इस्राएलच्या विजयांचा सारांश देते.
स्मरणविजयभूमीपूर्ण झालेले वचन
1यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:
2हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.
3अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.
4बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.
5त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते.
6याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.
7यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्‍यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्‍या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.
8यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते. त्या प्रदेशांचे राजे हे होते:
9यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,
10यरुशलेमचा राजा-एक, हेब्रोनचा राजा-एक,
11यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,
12एग्लोनाचा राजा-एक, गेजेरचा राजा-एक,
13दबीरचा राजा-एक, बेथ-गादेरचा राजा-एक,
14होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,
15लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,
16मक्केदाचा राजा-एक, बेथेलचा राजा-एक,
17तप्पूआहचा राजा-एक, हेफेराचा राजा-एक,
18अफेकाचा राजा-एक, शारोनचा राजा-एक,
19मादोनाचा राजा-एक, हासोरचा राजा-एक,
20शिम्रोन-मरोनाचा राजा-एक, अक्षाफाचा राजा-एक,
21तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,
22केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,
23नाफथ दोरचा राजा-एक, गिलगालातील गोईमाचा राजा-एक,
24तिरजाहचा राजा-एक, ते सर्व एकूण एकतीस राजे होते.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.