A trumpet sounds above Jerusalem as families and priests gather in repentance between a dark advancing swarm and rain-lit renewed fields

योएल 2

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
एक कर्णा परमेश्वराच्या दिवसाचा व त्याच्या प्रचंड सैन्याचा इशारा देतो. योएल संपूर्ण समाजाला संपूर्ण हृदयाने परतण्याची हाक देतो कारण देव कृपाळू व दयाळू आहे. न्याय दयेला, पुनर्स्थापित कापणीला, आत्म्याच्या ओतण्याला, विश्वव्यापी चिन्हांना, आणि परमेश्वराला हाक मारणाऱ्यांसाठी सुटकेला जागा देतो.
परमेश्वराचा दिवसपश्चात्तापपुनर्स्थापनाआत्मा
1सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—
2तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा, मेघांचा व दाट काळोखाचा दिवस. जसे डोंगरावर विस्तारलेल्या पहाटेसारखा आहे तसे विशाल व बलवान सैन्य चालून येत आहे, यापूर्वी असे कधी झाले नव्हते, नंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही.
3त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.
4त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.
5रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.
6त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात; हे प्रत्येक चेहरा फिका पडतो.
7वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.
8ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात.
9शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!
10पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.
11याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?
12तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.
13तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
14कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.
15सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.
16लोकांना एकत्र करा, सभेला पवित्र करा; वडिलजनांना एकत्र आणा, बालकांना आणि स्तनपान करणार्‍या अर्भकांना देखील एकत्र आणा. वराला त्याच्या निवासस्थानातून आणि वधूला तिच्या खोलीतून बोलवा.
17याहवेहसमोर सेवा करणार्‍या याजकांनी, द्वारमंडप आणि वेदी यांच्यामध्ये रडत उभे राहावे. आणि त्यांनी असे म्हणावे, “हे याहवेह, तुमच्या लोकांना वाचवा, आपल्या वतनाला राष्ट्रांमध्ये अप्रतिष्ठा किंवा चेष्टेचे कारण होऊ देऊ नका. ‘त्यांचा परमेश्वर कुठे आहे?’ असे त्यांनी लोकांमध्ये का म्हणावे.”
18मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील.
19याहवेहने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षारस व जैतून तेल पाठवित आहे, जे तुम्हाला तृप्त करण्यास भरपूर आहे; पुन्हा कधीही मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उपहासाचा विषय होऊ देणार नाही.
20“मी उत्तरेकडील उपद्रवी टोळीस काढून त्यांना तुझ्यापासून दूर नेईन; मी त्यांना होरपळून निघालेला ओसाड प्रदेशात ढकलून देईन; त्याची पूर्वेचा रांग मृत समुद्रात बुडवेन व पश्चिमी रांग भूमध्य समुद्रात बुडवेन. आणि मग त्यांचा दुर्गंध वर जाईल; त्यांचा दर्प वाढत जाईल.” निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहे!
21हे यहूदीय देशा, भिऊ नको; आनंद व उल्हास करा, निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहेत!
22वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका, कारण रानातील कुरणे हिरवीगार होत आहेत. झाडे आपली फळे देत आहेत; अंजिराची झाडे आणि द्राक्षवेली पुन्हा आपले सत्व देत आहेत.
23सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.
24खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.
25“मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.
26जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल, ज्यांनी तुमच्यासाठी अद्भुत कार्य केले आहेत त्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या नावाची तुम्ही स्तुती कराल, माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.
27तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे, आणि मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही; माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.
28“आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
29माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
30आकाशात व पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
31याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
32आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल; कारण याहवेहने म्हटले आहे सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये व जे उरलेले असतील ते वाचतील आणि ज्यांना याहवेहने बोलाविले ते सुद्धा तारण पावतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.