
इय्योब 35
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
एलीहू युक्तिवाद करतो की मानवी नीतिमत्ता देवाला काही जोडत नाही आणि मानवी पाप त्याच्यापासून काही घेत नाही, तरी दोन्ही इतर लोकांना प्रभावित करतात. तो म्हणतो की जुलूम झालेले आपल्या निर्मात्याकडे वळण्याऐवजी बरेचदा वेदनेमुळे ओरडतात, आणि देव अहंकारातून येणाऱ्या रिकाम्या विनवण्यांना उत्तर देत नाही.
एलीहूमानवी आचरणप्रार्थनाधीर
1एलीहू पुढे म्हणाला:
2“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’
3तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’
4“तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना मला उत्तर द्यायला आवडेल.
5वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा; तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा.
6जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार? तुझी पापे जरी पुष्कळ आहेत, तरी त्याचे त्यांना काय?
7जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?
8तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर, आणि तुझे न्यायीपण इतर लोकांवर परिणाम करू शकतात.
9“अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात; बलवान मनुष्याच्या हातून सुटकेसाठी आरोळी करतात.
10तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे, जे रात्रीच्या वेळी गीत देतात, ते कुठे आहेत,
11जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात, आणि आकाशातील पक्ष्यांपेक्षा आम्हाला अधिक ज्ञानी बनवितात?’
12परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे जेव्हा ते लोक आरोळी मारतात तेव्हा परमेश्वर उत्तर देत नाहीत.
13खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.
14मग ते तुझे कसे ऐकतील, जेव्हा तू म्हणतो की तुला ते दिसत नाहीत, की तुझा वाद त्यांच्यासमोर आहे आणि तू त्यांची वाट पाहावी,
15आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही.
16म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो; आणि ज्ञानाशिवाय शब्द वाढवित राहतो.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.