
इय्योब 11
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
सोफर मोठ्याने इच्छा करतो की देवाने बोलावे आणि इय्योबचा गृहीत धरलेला लपलेला दोष उघड करावा. तो विचारतो की इय्योब देवाच्या खोल गोष्टी, ज्या आकाशापेक्षा उंच व कबरेपेक्षा खोल आहेत, समजू शकतो का, नंतर इय्योबने पाप दूर केले तर त्याचे जीवन दुपारपेक्षा उजळ होईल असे वचन देतो.
सोफरफटकारपश्चात्तापआशा
1तेव्हा सोफर नामाथीने उत्तर दिले:
2“हे सर्व शब्द निरुत्तरीत राहतील काय? हा बडबडा मनुष्य न्यायी ठरेल काय?
3तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय? तू उपहास करीत असताना, कोणी तुझा निषेध करणार नाही का?
4तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’
5अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे
6आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत.
7“परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या मर्यादेचे तुला आकलन होईल का?
8ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील? ती अधोलोकाहून खोल आहे; तुला ते काय कळणार?
9त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद, आणि सागराहून ती अधिक विस्तृत आहे.
10“जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल?
11खरोखर ते फसविणार्यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का?
12जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही.
13“जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,
14तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस,
15तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.
16तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील.
17तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.
18आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.
19तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.
20परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल, आणि निसटून जाण्याचा मार्ग त्यांना आढळणार नाही; मृत्यूची धाप हीच त्यांची आशा असेल.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.