Jeremiah watching families leave shadowed Jerusalem along a long road that curves toward a distant sunrise

यिर्मयाह 16

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
यिर्मयाहचे अविवाहित व सामाजिकदृष्ट्या अलिप्त जीवन जवळ येणारा मृत्यू, शोक आणि हद्दपारीचे चिन्ह बनते. लोकांना सततच्या मूर्तिपूजेचे परिणाम भोगावे लागतात, तरी देव इतकी मोठी भावी पुनर्स्थापना देतो की विखुरलेल्यांना जमवणे निर्गमाच्या आठवणींना मागे टाकेल.
भविष्यसूचक चिन्हहद्दपारीमूर्तिपूजापुनर्स्थापना
1तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2“तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.”
3कारण ज्यांना या भूमीवर पुत्र आणि कन्या झाले आहेत आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आई आणि जे पुरुष त्यांचे वडील झाले त्यांच्याबद्दल याहवेह असे म्हणतात:
4“ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.”
5कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे,
6“या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत.
7शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.
8“ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस.
9कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘त्या दिवसामध्ये तुमच्या डोळ्यादेखत या ठिकाणी मी त्यांच्या हर्ष व आनंद गीतांचा, वर आणि वधूंच्या आवाजाचा शेवट करेन.’
10“हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’
11तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,
12परंतु तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा अधिक दुष्टपणा केला आहे. पाहा, माझी आज्ञा पाळण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने वागता.
13म्हणून मी तुम्हाला या राष्ट्रातून बाहेर फेकून देईन आणि तुमच्या पूर्वजांना अनोळखी अशा देशात तुम्हाला पळवून लावेन. तिथे गेल्यावर तुम्ही इतर दैवतांची रात्रंदिवस सेवा कराल, मी तुमच्यावर मुळीच कृपा करणार नाही.’
14“तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही,
15परंतु असे म्हटले जाईल, ‘जिवंत याहवेहची शपथ, ज्यांनी इस्राएलला उत्तर दिशेच्या भूमीतून व गुलामगिरीत पाठविलेल्या सर्व देशातून त्यांना बाहेर आणले.’ त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या या देशात मी त्यांना पुनर्वसित करेन.
16“परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील.
17कारण माझी नजर तुझ्या सर्व मार्गावर लक्ष ठेऊन आहे; ते माझ्यापासून लपू शकत नाही, आणि त्यांचे कोणतेही पाप माझ्या नजरेतून सुटत नाही.
18त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”
19याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.
20लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? होय, परंतु ते देव नाहीत!”
21“म्हणून मी त्यांना शिक्षण देईन— यावेळी मी त्यांना शिकवेन माझे सामर्थ्य व माझा प्रताप. मग त्यांना कळेल की माझे नाव याहवेह आहे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.