Astonished Jerusalem residents watching a siege camp dissolve at dawn beside an opened blank scroll

यशायाह 29

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
अरीएल म्हटलेले यरुशलेम वेढ्याला सामोरे जाते पण त्याचे शत्रू स्वप्नासारखे नाहीसे होतात. यशायाह शिकलेल्या शब्दांपुरती मर्यादित व सीलबंद समज असलेली उपासना उघड करतो, नंतर वचन देतो की नम्र आनंद करतील आणि बहिरे व आंधळे समज मिळवतील.
सुटकाउपासनासमजनम्रता
1अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो ते नगर जिथे दावीदाने वास्तव्य केले! वर्षा पुढे वर्ष जोडा आणि तुमच्या सणांचे चक्र पुढे चालू द्या.
2तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन; ती शोक करेल आणि विलाप करेल, ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल.
3मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन; मी तुमच्या भोवताली उंच बुरुजांचे रिंगण उभे करेन. आणि मी तुमच्याविरुद्ध वेढा घालण्याची कामे करेन.
4तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला. तुमचे बोलणे धुळीतून पुटपुटत येईल. पृथ्वीवरून तुमचा आवाज भुतासारखा येईल; धुळीमधून तुमचे बोलणे कुजबुज करेल.
5परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील, उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी. अचानक, एका क्षणातच,
6सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.
7तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी, जे तिच्यावर आणि तिच्या गडांवर हल्ला करतील आणि तिला वेढा घालतील, ते स्वप्नासारखेच होईल, ते रात्रीच्या दृष्टान्तासारखे—
8जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो; जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो. तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल.
9सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.
10याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.
11तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्‍या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”
12किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”
13प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.
14म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”
15धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”
16तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, जणू कुंभार हा मातीसारखा असेल! ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, “तू माझी रचना केली नाहीस?” मडके कुंभाराला म्हणू शकते का, “तुला काहीच माहीत नाही?”
17लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का, आणि सुपीक भूमी जंगलासारखी होणार नाही का?
18त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्‍यांना ऐकू येतील आणि अंधकार व औदासिन्यतेतून अंधाचे नेत्र पाहू लागतील.
19नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील; गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.
20निर्दयी नाहीसे होतील, आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—
21जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात, जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात, जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात.
22म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात: “येथून पुढे याकोब लज्जित होणार नाही. येथून पुढे त्यांचे चेहरे पांढरेफटक पडणार नाहीत.
23जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, माझी हस्तकृती बघतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.
24मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील; आणि कुरकुरणारे शिक्षण ग्रहण करतील.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.