Families leave broken idols beside the road and enter a dew-bright landscape filled with lilies, olive trees, grain, and fruitful vines

होशेय 14

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
होशेय इस्राएलला प्रामाणिक शब्दांसह परतण्याची हाक देतो, लष्करी व मूर्तिपूजक अवलंबित्व नाकारत. देव बंड बरे करण्याचे, मुक्तपणे प्रेम करण्याचे, आणि लोकांना कमळे, मूळ धरलेली झाडे, धान्य व द्राक्षवेलींसारखे भरभराटीस आणण्याचे वचन देतो. पुस्तक विवेकी वाचकांना त्याचे न्याय्य मार्ग शिफारस करत संपते.
पश्चात्तापबरे होणेनूतनीकरणशहाणपण
1हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!
2परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.
3अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”
4“मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.
5मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;
6त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.
7लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.
8हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”
9कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.