
होशेय 12
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
एफ्राईम वाऱ्यावर खातो, कपट वाढवतो, आणि अस्थिर करार पाठलाग करतो. होशेय याकोबचे हावरेपण, कुस्ती, प्रार्थना आणि सेवा आठवतो, इस्राएलला स्थिर प्रेम व न्यायासह परतण्याची विनंती करत. अप्रामाणिक संपत्ती दोष लपवू शकत नाही, तर देव संदेष्ट्यांद्वारे व आठवलेल्या सुटकेद्वारे बोलत राहतो.
कपटयाकोबपरतणेन्याय
1एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.
2याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील.
3त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.
4तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—
5याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, याहवेह हे त्यांचे नाव!
6पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.
7व्यापारी चुकीचे माप वापरतो आणि त्याला लबाडी करणे आवडते.
8एफ्राईम बढाई मारतो, “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही अपराध किंवा पाप आढळणार नाही.”
9“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.
10मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”
11गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्यासारख्या असतील.
12याकोब अराम देशात पळून गेला; इस्राएलने पत्नी मिळविण्यासाठी चाकरी केली आणि तिची किंमत चुकविण्यासाठी त्याने मेंढरे राखली.
13याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.
14पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.