Moses leading families through wilderness toward a brightly opened communal dwelling

इब्री 3

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
मोशे देवाच्या घरात सेवक म्हणून विश्वासू असला तरी, येशू त्याच्यापेक्षा अधिक सन्मानास पात्र आहे. अध्याय इस्राएलच्या वाळवंटातील अपयशाद्वारे वाचकांना हृदय कठोर न करण्याचा, अविश्वासात न पडण्याचा, आणि आत्मविश्वास न सोडण्याचा इशारा देतो.
येशू व मोशेदेवाचे घरकठोर हृदयेविश्वासूपणा
1यास्तव, पवित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात, ते तुम्ही आपले विचार येशूंवर केंद्रित करा, त्यांना आम्ही आमचा प्रेषित आणि महायाजक म्हणून कबूल करतो.
2कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते.
3कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्‍याला, घराला लाभणार्‍या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.
4कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.
5जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”
6परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.
7ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
8तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती.
9जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
10आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.
11मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”
12बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा.
13अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही.
14जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे.
15ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
16ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का?
17आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली?
18ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते?
19आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.