Families receiving water from the rock as Aaron and Hur support Moses' raised staff on the ridge

निर्गम 17

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
निर्गम 17 रफीदीम येथे पाण्याच्या कमतरतेवरून इस्राएलच्या भांडणाने सुरू होते. मोशे होरेब येथे खडकावर प्रहार करतो, आणि लोकांसाठी पाणी वाहते. अमालेक हल्ला करतो तेव्हा, यहोशवा बचावाचे नेतृत्व करतो तर अहरोन आणि हूर सूर्यास्तापर्यंत मोशेचे उंचावलेले हात सांभाळतात.
खडकातून पाणीपरीक्षापंचुकलेला आधारचिकाटी
1सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते.
2तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”
3पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”
4मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.”
5मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ.
6होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.
7मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबाह असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.
8नंतर अमालेकी आले व त्यांनी इस्राएली लोकांवर रफीदीम येथे हल्ला केला.
9मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.”
10मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले.
11जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे.
12जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.
13आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.
14मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”
15मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी असे ठेवले.
16तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.