
इफिसकरांस 5
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
विश्वासणाऱ्यांना स्वतःला देणाऱ्या प्रेमाद्वारे देवाचे अनुकरण करण्याची, विनाशकारी व अशुद्ध आचरण सोडण्याची, आणि प्रकाशाच्या मुलांसारखे चालण्याची हाक आहे. पौल वेळेचा शहाणा वापर, कृतज्ञ उपासना, परस्पर अधीनता, आणि ख्रिस्ताच्या काळजीवर आधारित विश्वासू वैवाहिक प्रेमाची विनंती करतो.
प्रेमात चालणेप्रकाशाची मुलेशहाणपणविवाह
1परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा.
2ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चला.
3तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत.
4आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी.
5तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
6पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो.
7यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका.
8कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.
9(प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)
10प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या.
11अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.
12अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल.
13परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते.
14त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”
15म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या.
16दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
17मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
18मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.
19आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.
20आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.
21ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.
22पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.
23कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे.
24आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे.
25पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले,
26जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;
27आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी.
28याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो.
29कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो.
30कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत.
31“या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”
32हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे.
33म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.