David singing on a high rock as storm clouds part over Jerusalem

2 शमुवेल 22

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
दावीद देवाची खडक, दुर्ग, तारणहार आणि विश्वासू कराराचा पालनकर्ता म्हणून स्तुती करतो. वादळ, खोल पाणी, युद्ध आणि आश्रयाच्या काव्यात्मक प्रतिमा शत्रूंपासूनच्या सुटकेचे वर्णन करतात आणि विश्वासू राजपदासाठी दिलेल्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करतात.
स्तुतीसुटकाआश्रयविश्वासूपणा
1जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले.
2तो म्हणाला: “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत;
3माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारे आहेत; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.
4“स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
5मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.
6मृतलोकाच्या दोर्‍यांनी मला सभोवती घेरले; मृत्यूचे भय मला सामोरे आले,
7“मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानी पडला.
8तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आकाशाचे पाये हादरले; याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.
9त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.
10आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.
11करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.
12अंधकार, व आकाशातील काळे मेघ; यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे.
13त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून विजा लखलखल्या.
14याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.
15त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.
16याहवेहच्या धमकीने त्यांच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.
17“वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.
18माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.
19माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.
20त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.
21“याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.
22कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.
23त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.
24मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.
25याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.
26“विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,
27शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
28नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात.
29हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात.
30तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो ; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
31“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
32याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?
33परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात , आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
34तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.
35ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.
36माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
37माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही विस्तृत मार्ग केला आहे.
38“मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
39मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले.
40तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.
41तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.
42त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.
43पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले.
44“लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,
45परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.
46त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.
47“याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत!
48परमेश्वरच आहेत, जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,
49ते मला माझ्या वैर्‍यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.
50म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी तुमच्या नावाची स्तुती गाईन.
51“ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.