
2 करिंथकरांस 3
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
करिंथकर स्वतः ख्रिस्ताचे जिवंत पत्र आहेत, शाईऐवजी आत्म्याने लिहिलेले. पौल जुन्या कराराच्या फिकट होणाऱ्या गौरवाला आत्म्याच्या चिरस्थायी स्वातंत्र्याशी विरोधाभास देतो, ज्याद्वारे बुरखाविरहित विश्वासणारे रूपांतरित होतात.
जिवंत पत्रनवीन करारआत्मारूपांतर
1आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का?
2आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात.
3तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.
4असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे.
5आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे.
6नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.
7आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले.
8पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय?
9दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!
10खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही.
11आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे.
12आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे.
13आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.
14परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल.
15आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते.
16परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते.
17प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे.
18आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.