Temple artisans crafting the bronze Sea, altar, lampstands, and golden furnishings

2 इतिहास 4

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
हूराम आणि कारागीर कांस्य वेदी, महान समुद्र, गंगाळे, दीपवृक्ष, मेज आणि अनेक सोन्याची भांडी घडवतात. काळजीपूर्वक बनवलेली प्रत्येक वस्तू मंदिरात बलिदान, शुद्धीकरण, प्रकाश आणि व्यवस्थित सेवेला समर्थन देते.
कारागिरीमंदिरसेवाउपासना
1त्याने वीस हात लांब आणि वीस हात रुंद आणि दहा हात उंच अशी कास्याची एक वेदी तयार केली.
2त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.
3त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.
4हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.
5त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.
6होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.
7दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या.
8त्याने दहा मेज तयार केले आणि ते मंदिरात ठेवले, पाच दक्षिणेकडे आणि पाच उत्तरेकडे. पाणी शिंपडणारे सोन्याचे शंभर कटोरे सुद्धा तयार केले.
9नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले.
10त्याने पाण्याचा हौद दक्षिण बाजूला, दक्षिणपूर्व दिशेच्या कोपऱ्यावर ठेवला.
11आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले:
12दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;
13त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);
14तिवड्या व त्यांची गंगाळे;
15हौद आणि त्याखालील बारा बैल;
16भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.
17राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.
18या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.
19परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती;
20नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे;
21सोन्याच्या फुलांची सजावट आणि दिवे आणि चिमटे (ते शुद्ध सोन्याचे होते);
22दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.