
1 शमुवेल 21
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
एकटा पळणारा दावीद अहीमेलेखला फसवतो आणि दोएग पाहत असताना पवित्र भाकरी व गल्याथची तलवार मिळवतो. गथमध्ये, ओळख पटल्याने दावीद धोक्यात येतो, आणि तो दुसऱ्या धोकादायक परिस्थितीतून सुटण्यासाठी आखीशसमोर वेडेपणाचे सोंग घेतो.
गरजफसवणूकआश्रयधोका
1दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?”
2दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे.
3तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.”
4परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”
5दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!”
6तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.
7त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.
8दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.”
9याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.”
10त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.
11परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?”
12हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली.
13म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.
14आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले?
15माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.