Omri building fortified Samaria while Ahab and Jezebel stand at a Baal altar

1 राजे 16

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
ओम्री तटबंदीयुक्त शोमरोन स्थापित करेपर्यंत हिंसक राजवंशीय बदल इस्राएलला अस्थिर करतात. त्याचा मुलगा अहाब पूर्वीच्या दुष्टतेला मागे टाकतो, ईजेबेलशी लग्न करून, बआलसाठी मंदिर बांधून, आणि राष्ट्राला मूर्तिपूजेत खोल नेत.
सत्तामूर्तिपूजाराजवंशभ्रष्टाचार
1हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:
2“मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे.
3म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.
4बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.”
5बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
6बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
7त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.
8यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
9जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.
10तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.
11तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.
12याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;
13कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.
14एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय?
15यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.
16जिम्रीने राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारले असे जेव्हा छावणीतील इस्राएली सैन्याने ऐकले, तेव्हा त्यांनी त्याच दिवशी सेनापती ओमरीला इस्राएलचा राजा म्हणून छावणीतच घोषित केले.
17तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला.
18शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला.
19कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले.
20जिम्रीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली बंडखोरी, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
21आता इस्राएली लोक दोन भागात विभागले गेले; अर्ध्या लोकांनी गीनाथचा पुत्र तिबनी याला पाठिंबा दिला, तर अर्ध्यांनी ओमरीला राजा होण्यासाठी पाठिंबा दिला.
22परंतु गीनाथचा पुत्र तिबनी याच्या समर्थकांपेक्षा ओमरीचे समर्थक अधिक प्रबळ झाले; म्हणून तिबनी मेला व ओमरी राजा झाला.
23यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले.
24त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.
25पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले.
26त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
27ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
28ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला.
29यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
30ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
31नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला.
32शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली.
33अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले.
34अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.