
1 राजे 12
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
रहबाम वडीलधाऱ्यांच्या सौम्य सल्ल्याला नाकारतो आणि जास्त ओझ्याची धमकी देतो, दहा गोत्रांना यराबामला राजमुकुट देण्यास प्रवृत्त करत. यराबाम नंतर आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी बेथेल आणि दान येथे प्रतिस्पर्धी उपासनास्थळे निर्माण करतो.
अहंकारसल्लाफूटखोटी उपासना
1रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.
2जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला.
3तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:
4“तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.”
5रेहोबोअमने उत्तर दिले, “तीन दिवसांसाठी माघारी जा आणि परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.
6तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?”
7त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”
8पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला.
9त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?”
10त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुला म्हणाले आहेत की, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू आपण हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे.
11माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ”
12तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”
13वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत राजाने लोकांना कठोरपणे उत्तर दिले,
14तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”
15अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.
16राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “आम्हाला दावीदामध्ये, इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, इस्राएला, तुझ्या डेर्यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले.
17परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.
18अदोनिराम जो मजुरी कामकर्यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.
19याप्रकारे इस्राएली लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.
20यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.
21जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.
22परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे परमेश्वराचे वचन आले:
23“शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,
24‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल जे तुमचे बांधव आहेत त्यांच्याविरुद्ध लढाईस जाऊ नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे माझ्यापासून आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि याहवेहने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपआपल्या घरी परत गेले.
25तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल बांधले.
26यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल.
27जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”
28आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”
29एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले.
30आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले.
31यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.
32आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.
33आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.